कोपरगाव शहर : महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या सातबारावरील मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदी अद्यावत केल्या जाणार असून या मोहिमेचा मुख्य उद्देश असा की, मयत खातेदाराच्या वारसांना शेतजमिनी संबंधित कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद वेळेत व्हावी हा उद्देश आहे. अनेकदा वारसांची नोंद नसल्यामुळे अडचणी येतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा कोपरगाव तालुक्यातील ज्या नागरिकांच्या सातबारावर अशा नोंदी राहिल्या असतील त्यांनी आपल्या गावातील तलाठी यांच्याकडे जाऊन आपल्या नोंदी करून घ्याव्यात, असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मयत खातेदारांच्या याद्या तलाठी यांच्यामार्फत तयार करण्यात येत आहेत. संबंधित मयत खातेदार यांचे वारसाची मृत्यू प्रमाणपत्रे व वारसांची माहिती संबंधित तलाठी यांच्याकडे घ्यावी. या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना समन्वयक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कडून नियुक्ती करण्यात आली असून ते आपल्या तालुकास्तरावर देखरेख करणार आहे. तेव्हा सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन सातबारा जिवंत म्हणजेच अद्यावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबद्ध कार्यक्रम राबवावा व जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल, याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी तसेच गावकऱ्यांनी आपापल्या गावातील तलाठ्यांना भेटून जिवंत सातबारा मोहिमेचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सावंत यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.
ही जिवंत सातबारा मोहीम १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ या कालावधीत राबवली जाणार आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी मृत्यू दाखला वारसा बाबत सत्य प्रतिज्ञा लेख, स्वयंघोषणापत्र, पोलीस पाटील अथवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांची नावे, वय, पत्ता, व मोबाईल नंबर रहिवासी बाबतचा पुरावा, महसूल अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून मंडलाधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर केला जाणार आहे.







