संस्था कोणाच्याही मालकीची नाही, ती जनतेची आहे – वैभव पिचड

0
74

अकोले : अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही कोणत्याही एका कुटुंबाची नाही, तर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची संस्था आहे, असे स्पष्ट विधान संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वैभव पिचड यांनी पत्रकार परिषदेत केले. संस्थेवर भ्रष्टाचार व एकाधिकारशाहीचे आरोप करण्यात आले असून, या आरोपांवर पुरावे सादर करावेत, असे त्यांनी आव्हान दिले.

गेल्या काही काळात संस्थेच्या व्यवस्थापनावरून वाद वाढले असून, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली दोन पत्रकार परिषदांमधून संस्थेवर गंभीर आरोप करण्यात आले होते. याला प्रत्युत्तर देताना पिचड यांनी सांगितले की, कोणत्याही एका घराण्याचा संस्थेवर ताबा राहणार नाही, तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही सभासद होण्यासाठी अर्ज नाही.

न्यायालयीन वाद प्रलंबित
सध्या संस्थेच्या कार्यकारिणी व विश्वस्त निवडीवर न्यायालयात खटला सुरू असल्याने, कोणतीही नवीन नियुक्ती किंवा निर्णय घेणे शक्य नसल्याचे पिचड यांनी सांगितले. कायम विश्वस्त सीताराम गायकर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर, त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती कोर्टाचा निकाल येईपर्यंत केली जाणार नाही.

विरोधकांनी दिलेला शब्द मोडला – पिचडांचा आरोप
पिचड यांनी सांगितले की, विरोधकांनी चर्चेचा शब्द दिला होता, मात्र त्याऐवजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एकतर्फी आरोप केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके आणि इतर सदस्यांनीही संस्थेवरील आरोप फेटाळून लावले.

आ. किरण लहामटे यांची भूमिका
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी संस्था ही जनतेच्या मालकीची राहावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, अशी भूमिका मांडली. त्यांनी दिवंगत मधुकरराव पिचड यांना आदरांजली अर्पण करत पारदर्शक कारभारावर भर देण्याची मागणी केली.

हा संपूर्ण वाद सध्या न्यायप्रविष्ट असून, अंतिम निर्णय कोर्टाच्या निकालावर अवलंबून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here