आर्मी मेडिकल कोअरची मागणी : अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात २५ खाटा राखीव

0
81

अहिल्यानगर – पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आर्मी मेडिकल कोअरने अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन तयारीच्या दृष्टिकोनातून २५ खाटा, २०० रक्तपिशव्या आणि १०० कर्मचारी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. या मागणीनुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तयारी सुरू केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले.

अहिल्यानगरमध्ये लष्कराच्या आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूल आणि मेकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर यांसारखी महत्त्वाची प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यामुळे येथे सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी वस्ती आहे. या पार्श्वभूमीवर, आर्मी मेडिकल कोअरने जिल्हा रुग्णालयाकडे वैद्यकीय सुविधा राखीव ठेवण्याची विनंती केली आहे.

या मागणीत १० रूटीन केअर बेड्स, १५ आयसीयू बेड्स (व्हेंटिलेटरसह), तसेच ईसीजी, डिफिब्रिलेटर, एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन, तपासणी लॅब यांसारख्या वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता नोंदवण्यात आली आहे. याशिवाय, २०० रक्तपिशव्या, ३ रुग्णवाहिका, आणि १०० मनुष्यबळ – ज्यामध्ये सर्जन, तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या मागणीनुसार आवश्यक सुविधा राखीव ठेवण्यासाठी नियोजन सुरू केलं असून, आपत्कालीन परिस्थितीत सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने सेवा देता यावी, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here