केडगावमध्ये बिबट्याची दहशत! वन विभागाच्या पथकाने लावला पिंजरा

0
90

केडगाव – केडगाव बायपास चौकाजवळील कांबळे वस्ती येथे शनिवारी (दि. १७ मार्च २०२५) रात्री बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सलीम रंगरेज यांच्या शेतात बिबट्याचं दर्शन झाल्यानंतर या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने पावले उचलली असून, रविवारी सायंकाळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

बिबट्याच्या हालचाली CCTV आणि व्हिडीओत कैद

बिबट्या दिसल्यानंतर परिसरातील काही नागरिकांनी त्याचा व्हिडीओ शूट केला आहे. तसेच, वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याच्या पावलांचे ठसेही आढळले. दोन दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्याने एका कालवडीची शिकार केल्याची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

वन विभागाची तत्काळ कारवाई

बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी सक्रिय झाले आहेत. रविवारी सकाळी वन्यजीव रक्षक आणि व्याघ्र संरक्षण समितीचे सदस्य मंदार साबळे, वनरक्षक विजय चेमटे, चालक संदीप ठोंबरे आणि अॅड. हर्षद कटारिया यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना आवश्यक सुरक्षा सूचना दिल्या.

नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

केडगाव परिसरात यापूर्वीही बिबट्याचे अस्तित्व आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, खबरदारी म्हणून रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे, लहान मुलांना घराबाहेर खेळू देऊ नये आणि घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत.

खोट्या अफवा आणि व्हिडीओ पसरवू नयेत – वन विभागाचा इशारा

सोशल मीडियावर बिबट्याच्या बाबतीत चुकीच्या अफवा आणि खोटे व्हिडीओ पसरवू नयेत, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे आणि मंदार साबळे यांनी केले आहे. वन विभागाच्या विशेष पथकाने बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

लवकरच बिबट्याला पकडण्याची शक्यता

वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामुळे लवकरच बिबट्याला पकडण्यात यश येईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी आणि वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here