जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा: योजनांच्या सर्वेक्षण व अन्वेषण कामात नवीन तंत्रज्ञानाचा वापर होईल

0
82

मुंबई: जलसंपदा विभागाच्या योजनांच्या सर्वेक्षण व अन्वेषण कामामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या कामांना गती देण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, गुगुळ प्रवाही वळण योजना अंतर्गत मांजरपाडा धरणाद्वारे गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, गुगुळ प्रवाही वळण योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी ३० प्रवाही वळण योजनांची कामे विविध टप्प्यांवर सुरू आहेत. या योजनेच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात ७.४० टीएमसी पाणी वळविण्याचे उद्दिष्ट आहे.

यातील १४ प्रवाही वळण योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली असून, यामुळे १.०८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जात आहे. त्याचबरोबर ८ प्रवाही वळण योजना बांधकामाधीन आहेत, ज्यामुळे २.०९ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा उद्देश आहे. आणखी ८ प्रवाही वळण योजना प्रस्तावित आहेत, ज्यामुळे ४.२३ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे.

यामध्ये विशेषतः पायरपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील योजना उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यात आली आहे. योजनेनुसार, पार नदीच्या स्थानिक नाल्यांवरील पाणी वळवून पूर्व गोदावरी खोऱ्यातील करंजवण धरणात पोहोचवले जाईल.

प्रस्तावित पार-तापी-नर्मदा प्रकल्प रद्द झाल्यामुळे उपलब्ध होणारे पाणी पार-गोदावरी योजनेच्या अधिकाधिक वापरासाठी तांत्रिक अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले. या सर्व योजनांवर कार्यवाही प्रगतीत असल्याचे ते म्हणाले.

या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे जलसंपदा विभागाच्या योजनांचे कार्य जलद गतीने आणि अधिक परिणामकारकपणे पूर्ण होईल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here