प्रदिर्घ लढाईनंतर दिव्यांगाना न्याय बसस्थानकातील सहा दुकाने वाटप करण्याचा न्यायालयाचा आदेश

0
58

संगमनेर – संगमनेर बसस्थानकातील तीन टक्के व्यापारी गाळे शासन निर्णयानुसार अपंग व्यक्तींना मिळावे यासाठी येथील सहा दिव्यांग बांधवांनी आठ वर्षे प्रदिर्घ न्यायालयीन लढा दिला. अखेर या लढाईला मोठे यश मिळाले असून औरंगाबाद खंडपीठाने विशेष सक्षम (अपंग) व्यक्तींना संगमनेर बसस्थानक संकुलातील दुकाने त्यांच्या आरक्षणाच्या हक्कानुसार तळमजल्यावर मिळावीत, असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.


याचिकाकर्ते शिवाजी संभाजी खुळे, जालिंदर कचरू लहामगे, पुरुषोत्तम बिसनलाल जोशी, शिवाजी गवराम कासार, सुनील बाबुराव खरे, गोरक्ष यशवंत रहाणे या सहा अपंग याचिकाकर्त्यांनी अपंग व्यक्तींसाठीच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या अधिनियमांतर्गत (१९९५ व २०१६) त्यांना संगमनेर बसस्थानकातील संकुलात प्राधान्याने दुकाने मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, एमएसआरटीसी व ठेकेदाराने त्यांना पहिल्या मजल्यावरील दुकाने दिली, जी अपंग व्यक्तींसाठी असलेल्या कृती योजनांच्या विरोधात असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.

न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य करताना नमूद केले की, अपंग व्यक्तींना तळमजल्यावर आणि इमारतीच्या समोरील बाजूस दुकाने मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे. तसेच, एमएसआरटीसीने प्रक्रिया न पाळता इतर अपंग व्यक्तींना दिलेली दुकाने बेकायदेशीर ठरवत ती रद्द करण्यात आली. जर अर्जदारांची संख्या उपलब्ध दुकानांपेक्षा जास्त असेल, तर लॉटरीद्वारे वाटप करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयान स्पर्धक उत्तरदाता/एमएसआरटीसी ला तीन महिन्यांच्या आत ही वाटप प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी स्थगितीची मागणी फेटाळण्यात आली आहे. हा निकाल अपंग व्यक्तींसाठी एक महत्त्वाचा न्यायिक निर्णय ठरला आहे. या याचिकाकर्त्यांपैकी सुनील खरे हे प्रदिर्घ लढाईच्या दरम्यान मयत झाले. न्यायालयाच्या या आदेशामुळे दिव्यांग बांधवांना प्रचंड आनंद झाला असला तरी सुनील खरे हे हा आनंदी दिवस पहायला आपल्यात नसल्याची भावना या निकालानंतर या लढाईत अग्रभागी असणारे शिवसैनिक जालिंदर लहामगे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here