अहिल्यानगर : ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील विळदघाट येथे अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला तब्बल 39 किलो गांजा जप्त करत तिघांना अटक केली आहे. गांजा आणि कार असा एकूण 13 लाख 75 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (13 ऑक्टोबर) करण्यात आली.
उपअधीक्षक शिरीष वमने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने विळदघाट परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयित कार पकडून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळला. पोलिसांनी कारसह तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत 39 किलो गांजा आणि वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी आहेत :
सतीश विजय शिंदे (वय 40, रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत), अशोक माणिकराव तरटे (वय 68, रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड), परसराम आनंदा परकाळे (वय 65, रा. पिंप्री घुमरी, ता. आष्टी, जि. बीड) सदर इसमांविरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विकास जाधव हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक जाधव, अंमलदार गणेश धुमाळ, देवीदास खेडकर, जाधव, सचिन वीर, निखील मुरूमकर, किशोर जाधव आणि नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.








