अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यात पैशाच्या वाटणीवरून नातवानेच आपल्या 75 वर्षीय आजीचा खून करून तिचे प्रेत घरातच जाळल्याची थरारक घटना घडली. दोन गुंठे जागेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटपाचा राग मनात धरून नातू सचिन सुरेश मैंदड (वय 30) याने आजीचा हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
किसनबाई छगन मैंदड (वय 75) या वृद्ध महिलेचा निर्दयपणे मारहाण करून मिरी येथील घरात खून करण्यात आला होता. पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत घरातच जाळले. घटनेची माहिती मिळताच मयत हिची मुलगी छाया खोसे हिने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे, चौकशी आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाचा मागोवा घेतला. त्यातून हा खून मयत किसनबाई यांचा नातू सचिन यानेच केल्याचे निष्पन्न झाले. किसनबाई यांनी दोन गुंठे जागा 12 लाख रुपयांना विकली होती. त्यातील पाच-पाच लाख रुपये दोन नातवांना देण्यात आले, तर उर्वरित 1 लाख 80 हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात आले. या रकमेचा वारस दुसरा नातू चैतन्य मैंदड असल्याने सचिनच्या मनात राग निर्माण झाला होता.
संक्रांतीच्या दिवशीही आरोपीने आजीला मारहाण केली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात न नेता घरीच ठेवले. अखेर 6 मे रोजी त्याने रागाच्या भरात आजीचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत घरातच जाळले. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणात आरोपी सचिन सुरेश मैंदड यास 8 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिसांकडून सुरू आहे.








