नेवासा : नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे 28 पितळी टाळ चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली असून चोरी केलेले 22,400 रुपयांची किमतीचे टाळे आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे.
ही घटना 28 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली, जेव्हा भजनी मंडळाच्या सदस्यांनी टाळ गायब असल्याचे निदर्शनास आणले. यानंतर अशोक बाबासाहेब चौधरी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास पोलीस नाईक बाबा वाघमोडे यांच्याकडे सोपवला.
पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने तपास सुरू केला. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास संशयास्पद ऑटोरिक्षा फिरताना दिसली. त्याचा मागोवा घेत पोलीस शेवगावपर्यंत पोहोचले.
शेवगाव येथे संबंधित रिक्षा राजू भगवान नागरे (रा. दादेगाव रोड, शेवगाव) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी राजू नागरे आणि संगीता सूर्यकांत सर्जेराव (रा. कापकर वस्ती, शेवगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी गुन्ह्याशी संबंध नाकारला, मात्र पोलिसांच्या तपासपद्धतीमुळे त्यांनी अखेर चोरीची कबुली दिली.
या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरी गेलेली 28 पितळी टाळ व रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. टाळे परत मिळाल्यामुळे सिद्धेश्वर भजनी मंडळातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींनी यापूर्वी इतर मंदिरांतही चोरी केली आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत.
या संपूर्ण तपासकार्याचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी केले. तपासात पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, गणेश जाधव व अमोल साळवे यांचे मोलाचे योगदान लाभले.








