अहिल्यानगर : पशुपालकांची चिंता वाढली असून जिल्ह्यात लम्पी आजाराचा जनावरांमध्ये झपाट्याने फैलाव होत आहे.यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथीच्या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचा सूचना केल्या आहेत.
प्रशासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यात आता जनावरांची खरेदी-विक्री, बाजार भरवणे, शर्यती आणि वाहतूक यांसारख्या सर्व हालचालींवर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे आदेश काढले असून, पशुसंवर्धन विभागाने संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सध्या संगमनेर तालुक्यातील साकूर, बिरेवडी, मांडवे, कनोली, रहिमपूर, निमगावजाळी, चिंचपूर, शिपलापूर, पिंपरी, तसेच शेवगाव तालुक्यातील वडुले आणि जामखेडमधील खर्डा या गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला आहे.
जिल्ह्यातील 192 गावांमध्ये 888 जनावरे बाधित झाली असून, त्यापैकी 35 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना :
बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या चार्याची विल्हेवाट लावावी.
गायी व म्हशींचे विलगीकरण करावे.
भटक्या जनावरांचे नियमित निरीक्षण करावे.
जनावरांच्या बाजारांवर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि गृह विभागाने नियंत्रण ठेवावे.
सार्वजनिक ठिकाणी जनावरांची गर्दी होणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी.
वाहतूक विभागाने जनावरांची हालचाल पूर्णतः थांबवावी.
तसेच, ज्या ठिकाणी लम्पीची लक्षणे दिसून येत असल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. गोठ्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित निर्जंतूक फवारणी करणे आणि मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.








