अहिल्यानगर : जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, सर्वाधिक रुग्ण राहाता तालुक्यात आढळून आले आहेत. मात्र, अशा गंभीर परिस्थितीत जबाबदारी झटकत सतत दांड्या मारणार्या महिला पशुधन पर्यवेक्षक दर्शना सातदिवे यांच्यावर कारवाई करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी त्यांना निलंबित केलं आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून आतापर्यंत 92 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे लंपीची लागण वाढत आहे. विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार आतापर्यंत लंपीमुळे 20 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रत्यक्षातील मृत्यूसंख्या अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात 472 जनावरे लंपी बाधित झाली असून त्यातील 20 जनावरे दगावली आहेत. वाढत्या संसर्गामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची दुसरी फेरी सुरू केली आहे. सुरुवातीला धुळे जिल्ह्यातून काही लसी मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेस फंडाचा वापर करून लसींची नव्याने खरेदी करण्यात आली.
2021-22 मध्ये देखील जिल्ह्यात लंपीचा मोठा प्रकोप झाला होता. शेकडो दुभत्या जनावरांचा बळी गेल्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये लंपीचा प्रादुर्भाव कमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, यावर्षी पुन्हा लसीकरणानंतरही लंपीचा धोका कायम असल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिन्यात लंपी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. जिल्ह्यात एकूण 13 लाख 78 हजार गायवर्गीय जनावरे असून यापैकी 92 टक्के जनावरांना लस देण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला 9 लाख 44 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले होते, त्यानंतर 3 लाख डोस मागवण्यात आले. धुळे जिल्ह्यातून 23 हजार डोस, तर स्वनिधीतून 76 हजार डोसांची खरेदी करण्यात आली आहे. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क झाली असली, तरी प्रत्यक्ष कामकाजात हलगर्जी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.








