शिर्डीतील ग्रो मोअर कंपनीच्या ११ खात्यातून तब्बल ८६५ कोटींची उलाढाल उघड

0
43

अहिल्यानगर : शिर्डी येथील ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीने हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचा प्रमुख भूपेंद्र राजाराम सावळे याला अटक केली असून, त्याची पोलीस कोठडी २९ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मुख्य आरोपी भूपेंद्र सावळेच्या चौकशीत कंपनीच्या ११ बँक खात्यांतून अवघ्या तीन वर्षांत तब्बल ८६५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील गंभीर बाबी लक्षात घेऊन तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. आरोपी सावळेने कोणत्या गुंतवणूकदारांकडून किती पैसे घेतले याबाबत खरी माहिती काढणे तपास अधिकऱ्यांपुढील मोठे आव्हान आहे. यासंदर्भातील अधिकृत पुरावे आणि तपशील न्यायालयात सादर करावा लागणार आहे.  

नाशिक, शाहादा, शिर्डी आणि राहाता या पोलीस ठाण्यांमध्ये सावळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. शिर्डी आणि राहाता येथील गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे तपास करत आहेत.

गुंतवणूकदारांना आवाहन

भूपेंद्र सावळे याने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शिर्डी व राहाता परिसरातील शेकडो लोकांना ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडले आहे. गुंतवणुकदारांनी आता कोणाच्या आमिषाला बळी न पडता आपल्याकडील कागदपत्रे घेऊन येथील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here