अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची उसंत; शेतकरी चिंतेत, पिकांना दुबार पेरणीचा धोका

0
46

अहिल्यानगर : जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ७२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी मागील वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता प्रचंड वाढली आहे. सध्या पेरलेली पिके माना टाकू लागली असून, पुढील आठ दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात यंदा ५ लाख १५ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असून, १ लाख ३० हजार ९२९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरले आहे. मक्याची ६६ हजार ५४६ हेक्टर, तुरीची ५२ हजार ९४ हेक्टर आणि उडीदाची ६० हजार ९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. बाजरी, मूग, भात आणि इतर पिकांचीही मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. जून महिन्यात ८०.२ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी जुलै महिन्यात आतापर्यंत केवळ ३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, हा पाऊस देखील मुख्यतः पाणलोट क्षेत्रापुरता मर्यादित राहिला आहे. इतर भागांमध्ये शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत.

सध्या ढगाळ वातावरण असूनही पाऊस न पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पिकांची उगम अवस्था असून, उशीर झाल्यास ती वाचवणे कठीण होणार आहे. दुबार पेरणी केल्यास उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कृषी विभागाने मात्र सध्या कोणत्याही प्रकारचा रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव नसल्याची माहिती दिली आहे. तरीही लवकरात लवकर समाधानकारक पावसाची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. जर आठ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here