मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित केला. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत 28 हजार 837 विद्यार्थ्यांची 27 एप्रिल 2025 रोजी एमएचटी-CET ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तब्बल 21 प्रश्न चुकीचे आले होते, त्यामुळे ही परिक्षा पुन्हा घेण्यात आली. याप्रकरणी विभागाने खुलासा करावा आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आमदार खताळ यांनी केली आहे.
संगमनेरचे आमदार अमोल खताळ व इतर सदस्यांनी विधानसभेचे लक्ष वेधत यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी संबंधित विषय तज्ञांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्या आनुषंगाने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
नेमकं घडलं काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका परिक्षा केंद्रावर 50 गुणांच्या गणिताच्या प्रश्न पत्रिकेतील सुमारे 20 ते 25 प्रश्नांमध्ये चारही पर्याय चुकीचे असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी चुकीचे पर्याय निवडले व याबाबत त्यांनी परिक्षा केंद्राकडे तक्रार केली असता कोणतीही दखल घेतली गेली नाही. याबाबत आमदार अमोल खताळ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत या प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली. तसेच यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर काय कारवाई केली. हे सभागृहाला सांगावे, असा प्रश्न आमदार खताळ यांनी सभागृहात उपस्थित केला.
आमदार अमोल खताळ आणि इतर विधानसभा सदस्यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी 2025 ही सामाईक प्रवेश परीक्षा PCB आणि PCM ग्रुपकरीता 9 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत 28 सत्रात घेण्यात आली होती. त्यातील 28 सत्रांपैकी 27 सत्रांमध्ये 6 लाख 77 हजार 560 उमेदवारांची परीक्षा सुरळीत पणे पार पडली.
मात्र, 27 एप्रिल 2025 रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी, मराठी आणि उर्दू या भाषेमध्ये घेण्यात आलेल्या PCM ग्रुपच्या परीक्षेदरम्यान 27 हजार 837 विद्यार्थी उपस्थित होते. गणित विषयाशी संबंधित २१ प्रश्नांमध्ये चूका असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या.
मराठी व उर्दू प्रश्नांमध्ये कोणतीही त्रुटी अथवा चूक नव्हती. इंग्रजी भाषांतरामध्ये त्रुटी/चुका आढळल्याने ज्या विद्यार्थ्यांनी. 27 एप्रिल 2025 रोजी परीक्षा दिलेली होती, अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुन्हा 05 मे 2025 रोजी फेर परीक्षा घेण्यात आली. ही फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले आहे.
अमेरिकेला निर्यात केलेला आंबा कागदपत्रातील त्रुटीमुळे नष्ट करावा लागला.
दरम्यान विधानसभा अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी आणखी एक तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. भारतातून अमेरिकेला निर्यात केलेला 4 कोटी 28 लाख रुपये किमतीचा आंबा कागदपत्रातील त्रुटीमुळे अमेरिकेतील व्यापाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे तो आंबा पुन्हा आणणे शक्य नव्हते त्यामुळे तो अमेरिकेतच नाहीसा करावा लागला. यातून या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रश्नाकडे विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी लक्ष वेधले.
याबाबत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल खुलासा केला, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची चौकशी करून नुकसान भरपाईच्या रकमेबाबतची खाताजमा करण्यात येत असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितले.








