संगमनेर : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अधोरेखित केला आहे. संगमनेर तालुक्यात ३४ नव्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची गरज असल्याची मागणी विधानसभेत ठामपणे मांडली. तालुक्यात सध्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या अत्यल्प असून, दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना, 34 नव्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची मागणी केली आहे. अलीकडच्या काळात शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय अडचणीचा ठरत आहे. हे लक्षात घेऊन उत्पन्न खर्च कमी होण्यासाठी नव्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची मागणी आमदार खताळ यांनी केले आहे.
विधानसभेत बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, संगमनेर तालुक्यात दुधाळ जनावरांची संख्या १,८०,००० आणि शेळी मेंढी संख्या दोन लाख तसेच कोंबड्यांची संख्या साडेचार लाख असून 24 पशुवैद्यकीय दवाखाने आज रोजी कार्यरत आहेत, परंतु संगमनेर तालुका हा दुग्ध उत्पादनात राज्यात अग्रेसर असून येथील दुधाळ जनावरांची संख्या नव्याने मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने तालुक्यात 58 पशुवैद्यकीय दवाखान्यांची गरज आहे.
सध्या फक्त 24 दवाखाने कार्यरत आहेत त्यामुळे पशुपालकांना सेवा मिळण्यात अडचण निर्माण होऊन खाजगी सेवा घ्याव्या लागतात व त्यापोटी अधिकचा पैसा खर्च करावा लागतो. आज रोजी दुग्ध व्यवसाय हा अडचणीत असून शेतकऱ्याला परवडत नाही त्यामुळे आमच्या तालुक्यात अजून 34 पशुवैद्यकीय दवाखान्यांची निर्मिती व्हावी. जेणेकरून शेतकऱ्यांना कमी दरात सुविधा मिळवून, त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. असा मुद्दा आमदार खताळ यांनी विधानसभेत मांडला.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर राजकारण चांगले तापले आहे. अशात शेती आणि शेतीशी संबंधित जोडधंदा यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या विधानसभेत मांडल्या जात आहेत. आमदार अमोल खताळ यांनी दुग्ध व्यवसाय संबंधित महत्त्वाच्या असणाऱ्या वैद्यकीय सोईबाबत विधानसभेत मागणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत वैद्यकीय सेवा मिळाल्यास त्यांना मोठी मदत होणार आहे.








