वारीवरील वक्तव्यावरून वादात अडकलेल्या अबू आझमींनी मागितली माफी

0
51

मुंबई : महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर माफी मागितली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजपसह विविध राजकिय पक्षांनी आणि वारकरी संप्रदायाने आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.

सोशल मीडियावर पोस्ट करत अबू आझमी यांनी स्पष्ट केले की, “माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवले गेले. माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आले. जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द परत घेतो आणि मनापासून माफी मागतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.”

आझमी पुढे म्हणाले, “मी एक निष्ठावंत समाजवादी कार्यकर्ता असून मी सर्व धर्म, संस्कृती, सुफी संत आणि त्यांच्या परंपरांचा सन्मान करतो. वारीची परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचा अभिमानास्पद भाग आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो.”

तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “मी पालखीचा उल्लेख केवळ मुस्लिम समाजाच्या विरुद्ध होणार्‍या भेदभाव आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता. माझ्या वक्तव्याचा हेतू कोणत्याही प्रकारे तुलना करण्याचा नव्हता. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी त्या स्वरूपात वक्तव्य केले होते. अल्पसंख्याक समाजाला वेगवेगळे कायदे आहेत, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ नये, हा माझा हेतू होता” असे आझमी यांनी म्हटले आहे. आता आझमी यांच्या या माफीमुळे निर्माण झालेला वाद थांबतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं वारी संदर्भात काय म्हणाले होते अबू आझमी?
अबू आझमी यांनी म्हटले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केली नाही. पण, ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिमांच्या बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here