दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपात अहिल्यानगर जिल्हा देशात आघाडीवर : डॉ. सुजय विखे

0
44

कोपरगाव : देशातील दिव्यांग आणि वयोवृद्धांना सहाय्यक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या योजनेअंतर्गत, अहिल्यानगर जिल्ह्याने देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने एका वर्षासाठी ७० कोटींची तरतूद केली असताना, एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात ४५ कोटी रुपयांचे सहाय्यक साहित्य वितरित करण्यात आले. यामुळे सर्वाधिक ४० हजार लाभार्थ्यांना या जिल्ह्यात मदत मिळाली असल्याची माहिती पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

संवत्सर येथे दिवंगत लोकनेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या २१ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात २१० दिव्यांग व वयोवृद्धांना सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे कनिष्ठ व्यवस्थापक कमलेश यादव, टर्शियरी सुपर स्पेशालिटी सेंटर व्यवस्थापक डॉ. अभिजित मेरेकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. दीपक अनाप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, “सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करत असतो, पण वयोमान वाढल्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती सहाय्यक साधने घेण्यास सक्षम नसते. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली असून देशभरात मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली जात आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. तसेच, “कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात संघटनात्मक बांधणी करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

वाटप करण्यात आलेली सहाय्यक साधने
वयोश्री योजनेअंतर्गत श्रवणयंत्र, मानेचा पट्टा, कमोड चेअर, वॉकर, गुडघ्याचा पट्टा, पाठीचा पट्टा, सिलिकॉन कुशन, पाठीचा आधार पट्टा, तीन व चार पायाची काठी, अॅडजेस्टेबल काठी, शीटसहित काठी, व्हीलचेअर, कमोड व्हीलचेअर यांचा समावेश होता. दिव्यांग योजनेअंतर्गत बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल, ब्रेल किट, मोठी व्हीलचेअर, तीन चाकी सायकल आणि श्रवणयंत्र यांचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनात राजेश परजणे यांनी सांगितले की, “देशभरात दिव्यांग व वयोश्री योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये डॉ. सुजय विखे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. विखे परिवाराची ही चौथी पिढी जनसेवेच्या कार्यात यशस्वीरित्या काम करत आहे. जनतेने त्यांच्यावर असलेले प्रेम पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here