चोंडीतील अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी ६८१ कोटींच्या ऐतिहासिक विकास आराखड्याला सरकारची मंजुरी

0
55

जामखेड (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव चोंडी येथील स्मृतिस्थळाच्या जतन व विकासासाठी राज्य सरकारने ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विस्तृत आराखड्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली कायम ठेवत, ही सर्व कामे ३१ मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या वर्षी ६ मे रोजी अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने हा प्रस्ताव मान्य करत शासन निर्णय जारी केला.

समृद्ध वारसा जपणारा आराखडा

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक तज्ज्ञ व नागरिकांच्या सल्ल्यानं तयार करण्यात आलेल्या या आराखड्याला राज्य स्तरावरील शिखर समितीनं ६ मे रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर मंत्रालयात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत पाठपुरावा करून २८ मे रोजी अधिकृत मंजुरी मिळवण्यात आली.

या योजनेमुळे चोंडीतील स्मृतिस्थळ केवळ संवर्धित होणार नाही, तर ते राष्ट्रीय पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऐतिहासिक मूल्यांची जपणूक, विकासाची दिशा

आराखड्यातील कामांमध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखालीच विकासकामे होतील. या प्रकल्पात केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ व ‘स्वदेश दर्शन’ यांसारख्या योजनांचा लाभ घेऊन काही उपक्रम राबवले जातील.

अंमलबजावणीचं नियोजन

या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने सर्व कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून, आवश्यक निधी आणि साधनसंपत्ती सरकारकडून वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्रिशताब्दी जयंतीचा गौरवसोहळा

३१ मे २०२५ रोजी चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती, राज्यपाल सी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here