जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा देण्याचे आश्वासन – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
217

अहमदनगर : आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यातून निघणाऱ्या २६० दिंड्यांना सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी योग्य समन्वय साधून नियोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात दिंडी नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे, ह.भ.प. अशोक सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, करमाळा मार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या या दिंड्यांसाठी संत निवृत्तीनाथ पालखी मार्गावरील खड्डे बुजवून साईडपट्ट्यांची दुरुस्ती करावी. तसेच, पारेगाव येथे मुलभूत सुविधा उभाराव्यात. संपूर्ण पालखी मार्गावर रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हवामान अंदाजासाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येईल.

प्रत्येक दिंडीत आवश्यक औषधांची व्यवस्था करण्यात येणार असून, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. दिंडी मुक्कामी थांबणाऱ्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालयांमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल. शुद्ध पिण्याचे पाणी, अखंडित वीज, शौचालय व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

वारी मार्गावरील वाहतुकीचे योग्य नियमन करण्यात येईल. प्रत्येक दिंडीसोबत पोलिस बंदोबस्त राहील आणि मुक्कामाच्या ठिकाणीही पोलिस कर्मचारी नियुक्त केले जातील. तसेच, तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या ७०० कोटींच्या विकास आराखड्यावर काम सुरू आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान देण्याची व प्रत्येक वारकऱ्यास ५ लाख रुपयांचा विमा कवच देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे.

पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीमुळे वारकऱ्यांचे आरोग्य बिघडू नये म्हणून, प्रत्येक दिंडीत शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. स्वतःचा टँकर असलेल्या दिंड्यांच्या टँकरमध्येही शुद्ध पाणी भरून दिले जाईल.

दिंडी मार्गावर स्वच्छता राखण्यासाठी ‘हरित वारी – निर्मल वारी’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. यावेळी आमदार कर्डिले, लंघे, आणि खताळ यांनीही वारीच्या नियोजनासंबंधी सूचना मांडल्या.

बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्ह्यातील ७६ दिंडी प्रमुख व वारकरी प्रतिनिधीही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here