संगमनेर : महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेली घरेलू कामगार महिलांसाठीची योजना ही संपूर्णतः मोफत आहे. लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेणे बेकायदेशीर आहे. मात्र काही ठिकाणी महिलांकडून पैसे घेऊन दिशाभूल केल्याच्या तक्रारी समोर येत असून, अशा फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.
महायुती सरकारने घरगुती कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील महिला लाभार्थीना साहीत्याचे वाटप आ. अमोल खताळ यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, महायुती सरकारने सर्वसामान्य माणूस केंद्रिभूत मानून योजनांचे निर्णय केले. त्याची अंमलबजावणी राज्यात यशस्वीपणे सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून योजना सर्व लाभार्थी पर्यत पोहचत असल्याचे त्यांनी सांगितले. घरेलू कामगार योजनेसाठी नाव नोंदणी करताना मोफत नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन केले होते. परंतू काही दलालांनी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या. त्यांच्या चौकशीची आदेश देण्यात आले आहे.
तालुक्यात महायुती सरकारला बदनाम करण्याचे काम काही मंडळीकडून होत असून, लोकांकडे आता माहीती आणि आधार कार्ड नंबर मागितले जात आहे. कोणालाही व्यक्तिगत माहीती आधारकार्ड नंबर देवू नका असे आवाहन करून कोणत्याही योजनेसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. पालकमंत्री कार्यालय तसेच माझे संपर्क कार्यालय जनतेसाठी सूरू असून तुम्ही स्वतः येवून योजनासाठी नोंदणी करावी. शासकीय कार्यालयात कोणी पैसे मागत असतील तर आमच्याकडे तक्रारी करा. असेही खताळ यांनी सूचित केले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, शिवसेना महिला जिल्हा उपाध्यक्षा दीपाली वाव्हळ, भाजप शहर अध्यक्षा पायल ताजणे, श्रीकांत गोमासे, गोकूळ दिघे, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, रेखा गलांडे आदी उपस्थित होते.








