मुंबई : काल सोमवार, ७ जुलै रोजी झालेल्या विधानसभेच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी जनतेच्या समस्या आणि मागण्या ठामपणे मांडल्या आहेत. संगमनेरच्या विकासासाठी विविध मुद्दांवर ठोस पाठपुरावा यानिमित्ताने त्यांनी केला आहे.
गोवंश कत्तलीबाबत चिंता व्यक्त
आमदार खताळ विधानसभेत बोलताना म्हणाले, राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही बेकायदेशीररीत्या काही ठिकाणी कत्तलखाने चालू आहेत. या गुन्ह्यांतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, त्यांच्यावर एमपीडीए किंवा मोक्कासारखे कायदे लावावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ज्या भागात गोवंश कत्तलीचे प्रकार जास्त आहेत, तेथील पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, असेही ते म्हणाले.
पशुपालकांसाठी घरपोच पशुवैद्यकीय सेवा हवी
आमदार अमोल खताळ यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास संदर्भात झालेल्या चर्चेत राज्यातील पशुपालकांच्या घरपोच सेवा सुलभ करण्याबाबत सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. आजारी जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्याऐवजी घरपोच सेवा देणं ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटीचे दर शासनाने ठरवून दिले आहेत, परंतु त्याचे डिजिटल ट्रॅकिंग गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने एक मोबाईल ॲप तयार करावे, ज्या माध्यमातून डॉक्टर आणि पशुपालकांचा संपर्क होईल. तसेच या दवाखान्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनं दिली, तर खर्चही कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेचा अभिमान
खताळ म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. मराठी शिकून अनेक मोठे लोक जगात नावाजले. त्यामुळे राज्यात मराठी भाषेलाच प्राधान्य दिलं पाहिजे, दुसऱ्या भाषांना नाही. “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणीची त्यांनी यावेळी आठवण करून दिली.
संगमनेरच्या कलाकारांचा गौरव व स्मारकाची मागणी
संगमनेरमधील लोककला जपणारे कलाकार पवळा भालेराव, अनंत फंदी, विठ्ठल उमप, कांताबाई सातारकर, गुलाबबाई संगमनेरकर यांना स्मरणात ठेवण्यासाठी स्मारक आणि लोककला प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
वीज सुविधा सुधारण्याची मागणी करताना, संगमनेरमधील मेंढवन येथे स्वतंत्र १३२ केव्ही क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात यावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुरवणी मागणीत मुद्दा मांडला आहे.
दरम्यान, विधानसभेत आमदार अमोल खताळ यांनी प्रश्न आणि त्यावरील ठोस उपाय आशा स्पष्ट मागण्या ठेवून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. वीजटंचाईपासून ते पशुपालकांच्या अडचणी, आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनापर्यंत प्रत्येक मुद्दा त्यांनी अभ्यासपूर्ण मांडला आहे. ग्रामीण भागातील गरजा समजून घेऊन, आधुनिक उपायांची मागणी करत त्यांनी विकासाची दिशा स्पष्ट केली आहे.








