संगमनेर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ पाटील आणि महायुती संगमनेर यांच्यावतीने आयोजित ‘भक्तिगीतांची मैफल’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह हजारो संगमनेरकर विठ्ठलभक्तांनी मालपाणी लॉन्स येथे या कार्यक्रमाला हजेरी लावली.
यावेळी पराग पांडव आणि सुरभी कुलकर्णी यांच्या सुमधुर, भावस्पर्शी सादरीकरणाने रसिकांची मनं जिंकली. श्री विठ्ठलनामाचा गजर संपूर्ण सभागृहात दुमदुमत होता. श्री. नरेंद्र साळवे, श्री. सत्यजीत सराफ, श्री. सिद्धार्थ थत्ते, श्री. वैभव पवार आणि श्री. प्रथमेश बिडवे यांनी आपल्या सुरेल संगीताने कार्यक्रमाला आणखी गोड स्वरूप दिले.
दरम्यान, काल आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सर्वत्रच भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये भक्तांच्या दर्शनासाठी लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. यानंतर संध्याकाळ भक्तिगीतांची मेजवाणी संगमनेरकांना अनुभवायला मिळाली. श्रोत्यांना हा संपूर्ण कार्यक्रम भक्ती, अध्यात्म आणि सुरांची अमूल्य अनुभूती देणारा ठरला.
भक्तिगीतांची मैफल या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार अमोल खताळ यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, “अशा भक्तिमय कार्यक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, तसेच संस्कृतीची समृद्ध परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचण्यास मदत होणार आहे”.
आमदार अमोल खताळ यांनी रसिकांसोबत उपस्थित राहून भक्तिगीतांचा मनःपूर्वक आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व कलाकार, संयोजक, भाविक आणि संगीतप्रेमींचे आभार मानले व अशा प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम सातत्याने होत राहावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.








