संगमनेर हादरलं! दारूसाठी ५० रुपये न दिल्याने १७ वर्षीय मुलाने शिक्षकाला दगडाने ठेचले

0
74

संगमनेरच्या तरुण पिढीचे वास्तव दाखवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू प्यायला ५० रूपये दिले नाही या रागातून एका १७ वर्षीय मुलाने रस्त्याने जाणाऱ्या शिक्षकाला शहरातील परदेशपुरा येथे दगडाने ठेचून गंभीर जखमी केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास वाघमारे यांच्यावर ६ ऑगस्टच्या रात्री निर्घृण हल्ला झाला. रात्री रस्त्याने जात असताना एका तरुणाने त्यांना अडवले. नशेत असलेल्या त्या तरुणाने वाघमारे यांच्याकडे दारूसाठी ५० रुपये मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, संतप्त तरुणाने त्यांना जमिनीवर पाडले आणि बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर त्या तरुणाने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलून वाघमारे यांच्या डोक्यावर घातला. या हल्ल्यात वाघमारे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यावर आणि कानावर खोल जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर आरोपीने त्यांच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पलायन केले. काही वेळाने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.

दरम्यान माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, परिसरातील देशी दारूच्या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी वाडेकर गल्ली परिसरातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी सदर तरूणास ताब्यात घेतले आहे. जखमी सुहास वाघमारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here