संगमनेर : जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस दलात मोठ्या खांदेपालटीचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलांत सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांसह सुमारे ११४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नेवासा, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलले आहेत. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास दुमणे यांची शिर्डीच्या साई मंदिरात मंदिर सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांची वर्णी लागली आहे. साळुंखे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे आता नवे पोलीस निरीक्षक असतील.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बदलीची शक्यता वर्तवली जात असतानाही संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांची बदली झालेली नाही. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शहरातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा रंगली होती.
नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांची बदली जिल्हा विशेष शाखेत झाली असून, त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांना दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. तर दहशतवाद विरोधी पथकाचे सध्याचे निरीक्षक अरविंद जोंधळे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे जिल्हा पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत नव्या जोमाने बदल अपेक्षित असून, काही संवेदनशील ठिकाणी अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








