संगमनेरात बनावट कागदपत्रे वापरून ३ लाखांची फसवणूक; बचत गटातील महिलांमध्ये भीती

0
37

संगमनेर : बनावट कागदपत्रांचा वापर करून एका महिलेने महिला बचत गटातील सदस्यांच्या नावाने तब्बल ३ लाख रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरीन खान मोहम्मद शेख यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे महिला बचत गटांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

फरीन शेख यांना आपल्या भावासाठी मोबाईल घेण्यासाठी कर्ज घ्यायचे होते. मात्र सिबिल स्कोअर तपासताना त्यांचा स्कोअर खूपच कमी असल्याचे दिसून आले. चौकशीसाठी त्या बँकेत गेल्या असता, एक वर्षापूर्वी घेतलेल्या ३ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे स्कोअर खराब झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर दिलेल्या कागदपत्रांमधून त्यांच्या नावावर खोट्या सह्या करून हे कर्ज घेतल्याचे स्पष्ट झाले.

तक्रारदार फरीन शेख यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिलेने त्यांच्या नकळत आधारकार्ड, पॅनकार्ड व रेशनकार्ड मिळवून त्यावर खोट्या सह्या केल्या. त्यानंतर ‘आयेशा महिला बचत गट’ व ‘जय हिंद महिला बचत गट’ या नावाने बँक ऑफ बडोदा, संगमनेर शाखेतून ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले.

या फसवणुकीसाठी आरोपी महिलेने फरीन यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक नसलेल्या खात्याचा वापर केला होता, त्यामुळे कोणतेही ओटीपी किंवा मेसेज त्यांना मिळाला नाही. या प्रकरणात बँकेतील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बँकेचे व्यवस्थापक पंकज यांनीसुद्धा या गैरप्रकाराची कबुली देत आवश्यक पुरावे तक्रारदाराला दिल्याचे सांगितले. व्याजासह या कर्जाची रक्कम आता तब्बल ४ लाखांवर गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here