संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेत तसेच निर्वाचक गण रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य सरूनाथ सुखदेव उंबरकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे २१ जुलै रोजी संगमनेर तहसील कार्यालयात हरकत अर्ज सादर केला.
उंबरकर यांनी आपल्या हरकतीत नमूद केले आहे की, तहसीलदार (निवडणूक निर्णय अधिकारी) यांनी प्रभाग आणि गण रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या ४ ऑक्टोबर २०११ रोजीच्या सूचनांचे तसेच शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन केले आहे. आयोगाच्या निर्देशांनुसार प्रभाग व गण रचना उत्तर दिशेपासून सुरू होऊन ईशान्य, पूर्व, पश्चिम आणि शेवटी दक्षिण दिशेकडे सरकणारी असावी. मात्र, या नियमानुसार न करता, राजकीय दबावाखाली ही रचना करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या २०२५ मधील निकालानुसार, पूर्वीचीच रचना कायम ठेवून आरक्षण जाहीर करून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निकालाचा देखील अवमान झाल्याचे उंबरकर यांनी हरकतीत नमूद केले आहे.
उंबरकर म्हणाले की, या प्रारूप रचनेत तालुक्याच्या भौगोलिक रचनेचा, गावांच्या सीमांचा, तसेच रस्त्यांच्या नैसर्गिक जोडणीचा विचार न करता केवळ काही राजकीय नेत्यांच्या फायद्यासाठी प्रशासकीय अधिकारांचा दुरुपयोग करण्यात आला आहे.
त्यांनी असेही अधोरेखित केले की, आरक्षण सोडतीसह प्रारूप प्रभाग व निर्वाचक गण रचना एकाच वेळी प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. परंतु, संगमनेर तहसील कार्यालयाने ही प्रक्रिया स्वतंत्रपणे व नियमबाह्य रितीने राबवली असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, अन्यायकारक रचना रद्द करून नव्याने नियमानुसार रचना करावी, अशी मागणीही उंबरकर यांनी केली आहे.








