संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्त धाम दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेच्या बदनामीच्या व्हिडिओचे यूट्यूब चॅनेलवरील प्रसारण थांबवण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकोले येथील न्यूज सह्याद्री एक्सप्रेस या यूट्यूब चॅनेलचे संपादक भाऊसाहेब साळवे याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
संस्थेचे कामकाज पाहणारे युवक शिवम राजेंद्र गडगे (वय २१, रा. वडगाव पान) यांच्याकडे वारंवार फोन करून साळवे यांनी बदनामीकारक व्हिडिओ व ऑडिओ क्लिप यूट्यूब चॅनेलवरून न काढल्यास संस्थेची प्रतिमा मलिन होईल, असे सांगत १० लाख रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीने ४ लाख देण्याचे ठरले. बुधवारी (दि. ६) पैसे देण्यासाठी गडगे यांनी साळवे यांना अकोले येथील कार्यालयात बोलावले. आधीच सापळा रचलेल्या संगमनेर तालुका पोलिसांनी ४ लाख रुपये स्वीकारताना पत्रकार साळवे याला रंगेहाथ पकडले.
साळवे यांनी संस्थेत येऊन भाविक व कार्यकर्त्यांचे व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्ड केले आणि ते त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करून बदनामी सुरू केली. ही प्रसारणे थांबवण्यासाठीच त्यांनी खंडणीची मागणी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणामुळे ग्रामिण भागात डिजीटल मीडियाचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे, या प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे. दरम्यान, संगमनेर तालुका पोलिसांचा हा कारवाईचा वेग आणि तत्परता स्थानिक पातळीवर कौतुकास्पद ठरली आहे.








