संगमनेर : लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि हिंदू धर्मविरोधी कारवायांवर आवाज उठवण्यासाठी संगमनेरमध्ये “एक राखी धर्मरक्षणाची” हा विशेष उपक्रम पार पडला. आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज, संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले होते.
रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाला संगमनेर मतदारसंघातील विविध भागांतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार अमोल खताळ यांच्या हातावर राखी बांधली. यावेळी इतक्या राख्या बांधल्या गेल्या की, त्यांच्या हातावर जागा कमी पडली. राखी बांधून घेताना लाडक्या बहिणींच्या रक्षणाबरोबरच धर्माच्या रक्षणाचे वचन आमदार अमोल खताळ यांनी दिले.
आमदार अमोल खताळ यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मागील काही महिन्यांत विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक प्रश्नांवर सातत्याने काम केल्यामुळे मतदारसंघातील महिलांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी वाढली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक भगिनी त्यांच्याशी आपुलकीने जोडल्या गेल्या असून, “एक राखी धर्मरक्षणाची” या उपक्रमात त्यांना राखी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्या. हा सहभाग म्हणजे लाडक्या भावासारखा आमदार खताळ यांना महिलांचा विश्वास आणि मिळालेला पाठींबा आहे.
भगिनींच्या उदंड प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी भगिनींनी आमदार खताळ यांच्या हातावर राखी बांधून केवळ भावाचे प्रेम व्यक्त केले नाही, तर हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एकत्र उभं राहण्याचा निर्धारही व्यक्त केला.
या प्रसंगी भगिनींनी लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि स्त्रियांच्या सुरक्षेच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली. आमदार अमोल खताळ यांनी भगिनींच्या या भावना ऐकून घेतल्या आणि हिंदू समाजाच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे राहण्याचा विश्वास दिला. महिलांचा हा सहभाग सामाजिक जागृतीचा ठसा उमटवणारा ठरला आहे.








