शेती पाण्यात बुडाली, कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी! बार्शीत दोन शेतकर्‍यांच्या एकाच दिवशी आत्महत्या

0
45

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. दहिटणे आणि कारी या दोन गावांमध्ये 24 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दहिटणे गावातील लक्ष्मण काशिनाथ गवसाने (वय 58) हे दीड एकर शेतीवर उदरनिर्वाह करणारे अल्पभूधारक शेतकरी होते. सलग पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याशिवाय ते काही दिवसांपासून शारीरिक आजारानेही त्रस्त होते. मानसिक तणावाखाली त्यांनी गावातील शेतात झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

दुसरी घटना कारी गावातील शरद भागवत गंभीर (वय 45) यांच्याशी संबंधित आहे. त्यांची साडेतीन एकर शेती आणि त्यातील पेरू-लिंबू बागायती सलग पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तब्बल 10 लाख रुपयांचे कर्ज फेडण्याची चिंता आणि उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने गंभीर यांनीही गळफास घेत आत्महत्या केली.

या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून, अधिक तपास सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी तालुक्यातील शेतकरी वर्ग आणि नागरिकांमध्ये संताप व दुःखाचे वातावरण आहे.

स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अशा आणखी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here