संगमनेर : तालुक्यातील चंदनापुरी येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (दि.२५) दुपारी टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात लता रमेश काळे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यात अकरा वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. एकरी वाहतुकीमुळे आणखी एक मृत्यू झाल्याने प्रशासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्जत तालुक्यातील बजरंगवाडी येथील हे सर्वजण इगतपुरी येथे देवदर्शन करून पुण्याच्या दिशेने परत येत होते. चंदनापुरी शिवारात कार व टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढून संगमनेर येथील कुटे रुग्णालयात दाखल केले.
या मार्गावर सध्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून दुहेरी वाहतूक एकाच पदरावरून सुरू आहे. हीच अकार्यक्षम व्यवस्था अपघाताचे मुख्य कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही काळात या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांत संताप आहे. “आता तरी प्रशासन जागे होणार का? की अजूनही निष्पापांचे बळी जात राहणार?” असा संतप्त प्रश्न स्थानिकांनी उपस्थित करत आहेत.








