नवी दिल्ली १० फेब्रुवारी : संसदीय प्रक्रियेची सखोल माहिती मिळवून विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने आमदार अमोल खताळ पाटील यांनी लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे १० व ११ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस (PRIDE) च्या संसदीय अभ्यासवर्गात सहभाग घेतला.
या अभ्यासवर्गात संसदीय कार्यपद्धती, विधी निर्मिती, लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या आणि संसदीय शिष्टाचार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळाले. या अनुभवाच्या आधारे भविष्यात अधिक प्रभावीपणे जनतेच्या प्रश्नांवर काम करता येईल, असे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सांगितले.
या अभ्यासवर्गात लोकसभेचे सभापती श्री. ओम बिर्ला, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. श्री राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर ,उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना संसदीय प्रक्रियांविषयी मार्गदर्शन केले.
लोकसभा सचिवालय आणि PRIDE संस्थेच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करताना आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले की, “लोकशाही बळकट करण्यासाठी आणि विधायक कार्य करण्यासाठी असे अभ्यासवर्ग अत्यंत प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरतात.”








