जिल्ह्यावर दुबार पेरणीचे संकट, पावसाचा अंदाज घेऊनच धरणातून आवर्तनाचे नियोजन

0
44

अहिल्यानगर : जिल्ह्यात झालेल्या सुरुवातीच्या पावसाने धरणे बर्‍यापैकी भरलेली आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर दुबार पेरणीचे संकट दिसत असल्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात किती पाऊस होईल याचा अंदाज हवामान खात्याशी चर्चा करुन घेतला जाईल. त्या निर्णयावरच धरणांतील आवर्तनाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

विविध योजना आणि कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तसेच विभागीय अधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी (दि. 23) विशेष बैठक आयोजित केली असल्याची माहिती विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

पालकमंत्री म्हणाले, “पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणे भरतील की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, सुरुवातीच्या पावसामुळे धरणांत समाधानकारक साठा झाला. पण गेल्या महिन्याभरात पावसाने साथ सोडल्याने खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे आणि शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.”

यासंदर्भात हवामान विभागाकडून आगामी पावसाचा अंदाज घेऊनच शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येईल. प्रशासनाने सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अशा सूचना दिल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान, शेती, उद्योग आणि पाणीपुरवठ्यासाठी महत्वाचे ठरणारे भंडारदरा व मुळा धरण 75 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने पाण्याची आवक सुरू आहे.

निळवंडे धरणातही पाण्याची धीमी आवक सुरू असून साठा 7,253 दलघफू (87.18 टक्के) झाला आहे. मुळा धरणात 19,387 दलघफू (74.57 टक्के) पाणीसाठा नोंदविला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here