कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामे पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

0
67

मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी नूतनीकरण आणि विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, एकात्मिक मालवाहतूक इमारत आणि टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित असून ही कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. कामांची गती संथ असल्याचे नमूद करून आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे. तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत, असे फडणवीस यांनी सांगितले.

शिर्डी विमानतळ हे मुंबई व नवी मुंबई विमानतळांच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमानांच्या पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. यासाठी शिर्डी विमानतळावर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त जमीन संपादित करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुचना दिल्या आहेत.

नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. त्यानिमित्ताने राज्य सरकारकडून जोरदार पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीच्या निमित्ताने विविध सोई-सुविधांकडे विशेष लक्ष घातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here