अबब! ग्रो मोअर कंपनीचा भामटा भुपेंद्र सावळेकडून एलसीबीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच घेतली दीड कोटींची लाच; पोलिस विभागात खळबळ

0
38

अहिल्यानगर : दीड कोटी (१ कोटी ५० लाख) रुपयांची ऑनलाईन लाच घेतल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि तीन पोलीस हेडकॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण सात महिन्यांनंतर उघडकीस आले असून, अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

शिर्डीतील ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी’मध्ये एका व्यक्तीने ८ लाख रुपये गुंतवले होते. पण कंपनीचे लोक पैसे घेऊन पळाले. या प्रकरणात राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, याचा तपास एलसीबीकडे होता.

तपास करताना पोलिसांनी शिर्डीतील ग्रो मोअर कंपनीच्या भूपेंद्र सावळे या व्यक्तीला कारमधून जाताना अडवले. त्याच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा संशय होता. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या भावांना थांबवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि गुन्हा न करण्यासाठी तब्बल १.५ कोटी रुपयांची मागणी केली.

सावळेने ही रक्कम रोख स्वरूपात देता येणार नसल्याचं सांगितल्यावर, पोलिसांनी त्याला अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात नेलं. तिथे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. खोट्या गुन्ह्यात अडकण्याच्या भीतीने सावळेने त्यांच्याकडे सांगितलेल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले.

सात महिन्यांनी प्रकरण उघड

हा प्रकार सात महिने गुपित राहिला. पण आता चौकशीत तुषार धाकराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी २१ जुलै २०२५ रोजी चौघांवर निलंबनाची कारवाई केली.

अजूनही प्रश्न अनुत्तरित

काही वरिष्ठ पोलिसांचा दावा आहे की ही माहिती खोटी असू शकते आणि आरोपीने पोलिसांचा तपास चुकवण्यासाठी हे सांगितले असेल. तरीही, हे प्रकरण गंभीर असून, गुंतवणूकदार आता सखोल चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here