संगमनेरातील खराब रस्त्यांवरून संभाजी ब्रिगेड आक्रमक, दर्जाहीन कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार

0
42

संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नसल्याने वारंवार रस्ते खराब होत आहेत. यासंदर्भात रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी संगमनेर तालुका संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. सर्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकऱ्यांना याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.

अध्यक्ष राम अरगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. त्या सर्व रस्त्यांची कामे उत्तम प्रकारे का केली जात नाहीत? तसेच रस्त्याची कामे केल्यानंतर ते रस्ते सहा महिन्याच्या कालावधीत लगेच खराब कसे काय होतात, खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात? असाही सवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात केला आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे जनतेला असुरक्षित जीवन जगावे लागत आहे. जीव मुठीत धरून त्या रस्त्यावर प्रवास करावा लागतो आहे. याचे गांभीर्य प्रशासनास कधी कळणार की नाही? प्रत्येक वर्षी रस्त्याची दुरुस्ती करून जनतेचा पैसा सरकार वाया घालवत आहे. एकदाच उत्तम प्रकारचा रस्ता तयार करावा की, तो दीर्घकाळापर्यंत टिकेल व जनतेचा टॅक्स  रुपी पैसा वाया जाणार नाही. लोकशाही देशात जनतेकडून टॅक्स घेतला जातो परंतु त्या प्रमाणात जनतेला योग्य सुविधा मिळत नाहीत.

जर आपल्या कार्यक्षेत्रात असलेले रस्ते लवकरात लवकर उत्तम प्रकारे दुरुस्त झाले नाही व या नादुरुस्त रस्त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास, याला सर्वस्वी प्रशासन म्हणून सर्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनतेला उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कामास विलंब होऊन जर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास रस्त्यावर बसून आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here