
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासणार
संगमनेर, दि.३ डिसेंबर : “नाशिक–पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे व्हावी, हा माझा पूर्वीपासूनचा ठाम आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. हा कोणाच्या विरोधाचा किंवा कोणाचे समर्थन करण्याचा विषय नाही; तो आपल्या संगमनेरच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न आहे,” अशी स्पष्ट भूमिका संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.
रेल्वे मार्गासाठी GMRT संदर्भात काही तांत्रिक कारणे पुढे केली जात असली तरी, या निर्णयाचा संगमनेरच्या विकासावर होणारा परिणाम गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. “सरकारलाही या निर्णयाचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळेच मी केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासण्याची मागणी करणार आहे,” असे खताळ यांनी सांगितले.
संगमनेरचा विकास, शहराची भविष्यातील कनेक्टिव्हिटी आणि नागरिकांच्या सुविधांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने या निर्णयाकडे गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
खताळ म्हणाले, “संगमनेरचा हक्क अबाधित राहावा, हीच आमची भूमिका आहे. नागरिकांच्या अपेक्षा योग्य दिशेने पूर्ण होत नसतील, तर त्यांच्या सोबत ठाम उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.”







