‘ज्यांना मूलभूत प्रश्न सोडवता आले नाहीत, ते पुन्हा विकास काय करणार; सुवर्णा खताळ यांचा विरोधकांना सवाल

0
40

संगमनेर : शहरातील नगरपरिषदेवर वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असूनही शहरातील मूलभूत प्रश्न कायम ठेवत नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांनी घणाघाती टीका केली आहे. “ज्यांच्या कारभारात मुलभूत सुविधा पूर्ण झाल्या नाहीत, तीच टीम पुन्हा शहराचा विकास करणार कसा?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुवर्णा खताळ या गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व प्रभागांमध्ये व्यापक दौरे करत आहेत. नागरिकांच्या घरी जाऊन, दुकानदारांना भेटून, स्थानिक अडचणी जाणून घेत असून त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “विधानसभा निवडणुकीत तुम्ही सर्वांनी अमोलभाऊ खताळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि ते आमदार झाले. आमदार झाल्यापासून तालुक्यात विकासाच्या कामांना खरी गती मिळाली. महायुती सरकारमुळे गेली चाळीस वर्षे जे झाले नाही, ते आम्ही एका वर्षात करून दाखवले.”

तथापि, नगरपरिषदेची अवस्था मात्र अत्यंत दयनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील प्रभागांमध्ये फिरताना आरोग्य सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्त्यांची दुर्दशा, शिक्षणाची पडझड हे प्रश्न अधिकच गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. “नगरपरिषदेच्या शाळांची स्थिती तर शब्दात सांगण्याजोगीही राहिलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. आम्ही निवडून आलो तर पुढील पाच वर्षांत हे सर्व मूलभूत प्रश्न सोडवू. जसे परिवर्तन तुम्ही विधानसभेत घडवून आणले, तसेच परिवर्तन आता नगरपरिषदेत घडवा. आम्हाला साथ द्या, आम्ही संगमनेरचे चित्र बदलून दाखवू असे आवाहन सुवर्णा खताळ यांनी नागरिकांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here