संगमनेर मतदारसंघात १८०० पाणंद रस्ते होणार!

0
194

आ.अमोल खताळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

संगमनेर | प्रतिनिधी
राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते अभियान अंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील १७०० ते १८०० पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

येथील प्रांतधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवार( दि. १६) रोजी दुपारी आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थिती बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार, विशाल ताम्हाणे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण, शेती उपयोगी अवजारे वाहतूक तसेच दळणवळणासाठी आवश्यक असलेले पाणंद रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. या अभियानामुळे शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या समस्या दूर होणार आहेत. या अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष संबंधित विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून मानद सचिव म्हणून प्रांताधिकारी काम पाहणार आहेत.

तहसील व महसूल विभागाच्या मदतीने आधी तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी समितीच्या माध्यमातून निधी दिला जाणार असून, पहिल्या टप्प्यात २५ किलोमीटर लांबीचे रस्ते घेण्यात येणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांना शेती रस्त्यांमुळे ज्या अडचणींचा सामना करावा लागत होता, त्या समस्या या अभियानामुळे दूर होतील. रस्ते तयार करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त निशुल्क उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून, रस्त्यांसाठी लागणारे गौण खनिजही शासनाकडून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत पाणंद रस्त्यांची तात्काळ मोजणी केली जाईल, असेही आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here