जलसंपदा विभागाची घेतली आढावा बैठक
संगमनेर/ प्रतिनिधी
निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यामुळे अनेक गावात पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असून, यापूर्वी पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांचाही जलसंपदा विभागाच्या वतीने सर्वे करून त्या गावांनाही लवकरच पाणी मिळवून दिले जाईल. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संगमनेर मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
घुलेवाडी येथील निळवंडे कालवा विभागाच्या कार्यालयात आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निळवंडे कालव्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर, अमित नवले, कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, अमोल कवडे यांसह कालवा विभागाचे अधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, पूर्वीच्या काळी निळवंडे, भोजापूर व आढळा परिसरातील काही गावे पूर्वी निळवंडे कालवा योजनेतून वगळली गेली होती. मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विभागाची जबाबदारी आल्यानंतर निळवंडे डावा व उजव्या कालव्यातून तीन टीएमसी पर्यंत पाणी वाहत असून, सर्वत्र पाणी उपलब्ध होत आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी कालवा विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. आमदार झाल्यापासून मतदारसंघातील नागरिकांकडून पाण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मागण्या येत असून, त्या सकारात्मकतेने सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
निवडणुकीपूर्वी काही मर्यादा होत्या, मात्र निवडणुकीनंतर अधिकार प्राप्त झाले. त्यामुळे या कामांना गती मिळाली आहे. काही जणांच्या राजकीय द्वेषातून पाण्यापासून कायमच वंचित राहिलेल्या मालदाड, सायखिंडी, कऱ्हे, मेंढवण, वेल्हाळे या गावांना आता पाणी मिळाले असून, पाणी देण्याचे पुण्य जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि मला लाभत असल्याचे सांगत आ. खताळ म्हणाले की, जलसंधारण खात्याची जबाबदारी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे असल्याने त्या विभागातील अपूर्ण कामेही लवकरच पूर्ण केली जातील. महायुती सरकार शेतकरी आणि सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले उपाध्यक्ष संदीप घुगे डिग्रसचे सरपंच अशोक खेमनार ॲड संदीप जगनर साहेबराव वळवे सागर कानवडे भागवत कानवडे राजेंद्र काळे किशोर भांड गणेश सोनवणे विनायक वाडेकर यांच्यासह या बैठकीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी या बैठकीमध्ये विविध सूचना केल्या. शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली असून, जलसंपदा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक निर्णय घेतील, असे आमदार खताळ यांनी सांगितले .
निळवंडेच्या दोन्ही कालव्यावरून मालदाड, सायखिंडी, मेंढवण, वेल्हाळे, कऱ्हे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, सावरगाव, डिग्रस, कोळवाडे, मालुंजे, शिरापूर, चिंचोली गुरव या भागांचा सर्वे करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्वे पूर्ण केला असून लवकरच जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे कालव्यावरून पाणी पुरवठा करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच निमगाव पागा व सावरचोळ परिसराचा सर्वे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, केवळ सर्वे न करता प्रत्यक्ष पाणी देण्याचे काम केले जाईल. – अमोल खताळ ( आमदार संगमनेर विधानसभा )








