संगमनेर : गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-तळेगाव-नाशिक एसटी बससेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे ही बससेवा सुरू करण्यात आली.
तळेगाव चौफुली येथे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ व संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या हस्ते बसला हार घालून श्रीफळ वाढवत पूजा करून धुमधडाक्यामध्ये स्वागत करण्यात आले. या मार्गावरील बस गेली सहा वर्षे बंद असल्याने तळेगाव, निमोण परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक व रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. नाशिकमध्ये शिक्षण, व्यवसाय तसेच हॉस्पिटलसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या मागणीसाठी परिसरातील महायुती कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
१४ ऑगस्ट रोजी आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे दिलेल्या मागणीपत्राची दखल घेऊन जिल्हा वाहतूक नियंत्रक शाखेने बससेवा सुरू केली. याबद्दल शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे व तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांचे आभार मानले.
बसचे चालक कलीम सय्यद आणि वाहक बाबासाहेब लांडे यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी ९ वाजता श्रीरामपूरहून सुटलेली बस साडेदहा वाजता तळेगाव चौफुलीवर पोहोचली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते व प्रवासी उपस्थित होते.
या सेवेमुळे श्रीरामपूर, लोणी, सिन्नर व नाशिकला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सेवेमुळे बस पुन्हा बंद पडू नये यासाठी नागरिकांनी प्रवासासाठी एसटीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन नीलम खताळ यांनी केले. आगामी काळात या मार्गावर अजून दोन–तीन फेऱ्या सुरू करण्याचा विचार असल्याचेही संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी सांगितले.








