अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी शासनाचे वेधले लक्ष
संगमनेर / प्रतिनिधी
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरात “मराठी भाषा भवन” स्थापन करण्याची मागणी विधानसभेत केली. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी संगमनेर येथे स्वतंत्र “मराठी भाषा भवन” उभारण्यात यावे आणि त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून देत सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी सभागृहातून केली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे हे संगमनेर मतदारसंघातील असल्याचा अभिमान असल्याचेही आमदार खताळ यांनी यावेळी नमूद केले. मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळींना नेहमीच चालना मिळत आली आहे.
संगमनेर हे शहर साहित्य, संस्कृती आणि सामाजिक चळवळींसाठी ओळखले जाते. अनेक साहित्यिक, कवी, लेखक आणि विचारवंतांनी या शहरातून मराठी साहित्यविश्वात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे या शहरात मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास, संशोधन, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी “मराठी भाषा भवन” उभारण्याची गरज असल्याचे आमदार खताळ यांनी अधोरेखित केले. मराठी भाषा भवन उभारल्यास येथे साहित्य संमेलन, व्याख्याने, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मराठी भाषेच्या अभ्यासासाठी विविध उपक्रम आयोजित करता येतील. तसेच तरुण पिढीमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान आणि जाणीव निर्माण होण्यासही मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात मराठी भाषा भवन उभारण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभा सभागृहातून केली. त्यांच्या या मागणीमुळे संगमनेर शहरातील सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळींना नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








