‘उद्धव ठाकरे म्हणजे युज अँड थ्रो’ ; एकनाथ शिंदे

0
93

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कालचे कृत्य बाळासाहेबांचे विचार अजूनही ज्यांच्या मनात आहेत, त्यांना मान खाली घालायला लावण्यासारखे होते. काय बोलायचे ? काय निर्णय घ्यायचा? व काय करायचे? हे सूचत नसलेले उबाठा नेतृत्व या निमित्ताने महाराष्ट्राला दिसले, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणजे अर्थात यूझ अँड थ्रो, असा पलटवारही त्यांनी यावेळी ठाकरेंच्या एसंशिं टीकेला प्रत्युत्तर देताना केला.

लोकसभेने बुधवारी मध्यरात्री २ वा. वक्फ सुधारणा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. यावेळी झालेल्या मतदानात ठाकरे गटाने या विधेयकाविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल एका पत्रकार परिषदेद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी केंद्राने वक्फ विधेयक जमिनींवर डोळा ठेवून आणल्याचा आरोप केला. त्यांच्या या टीकेवर एकनाथ बोलताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांच्या मनात अजूनही आहेत त्यांना मान खाली घालवण्यासारखे कृत्य काल झाले. त्यांच्या लोकप्रतिनिधींनीही खंत व्यक्त केली.

कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाठासाठी अत्यंत दुर्दैवी होता. त्यांनी वक्फ बोर्ड बिल व हिंदुत्वाचा काही संबंध नसल्याचा दावा केला. आमचा वक्फ बिलाला नव्हे तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ते अतिशय गोंधळलेल्या स्थितीत सापडल्याचे स्पष्ट होते. काय बोलायचे, काय निर्णय घ्यायचा, काय करायचे हे सूचत नसलेले उबाठा नेतृत्व काल दिसले. उद्धव ठाकरेंची स्थिती धरले की चावतंय आणि सोडलं की पळतंय अशी झाली आहे. बाळासाहेबांचा राष्ट्रभक्त मुस्लिमांना पाठिंबा होता. तीच भूमिका शिवसेनेची आहे. हीच भूमिका भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आहे. जो मुस्लिम देशभक्त व राष्ट्रभक्त आहे, ज्याचे या देशावर प्रेम आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना, मग ते कुणीही असले तरी आमचा त्यांना विरोध आहे. ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे घेऊन चालले. तीच भूमिका या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भाजपने दाखवली. परंतु, सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, त्यांच्या सोबत राहिल्यामुळे उबाठाला सातत्याने व वारंवार मोहम्मद अली जिना यांची आठवण येत आहे. हे दुर्दैव आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढेच सांगतो की, आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचे हे त्यांना सुधरत नाही. काय निर्णय घ्यायचे ते समजत नाही. त्यातून त्यांच्यावर आज आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली. त्यातून त्यांनी स्वतःचीच अब्रू काढून घेतली, असे शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, वक्फ बोर्डामुळे काही मूठभर लोकांच्या हातात लाखो, कोट्यवधी एकर जमीन अडकली होती. नव्या विधेयकामुळे त्याला चाप बसेल.

उद्धव ठाकरे गत काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख एसंशिं असा करत आहेत. पत्रकारांनी याविषयी शिंदे यांना छेडले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख यूटी अर्थात युज अँड थ्रो असा केला. वापरो और फेको ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काही आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही माझी गद्दार व खोके-खोके म्हणून हेटाळणी केली. अरे तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेने खोक्यामध्ये बंद करू टाकले. १०० मधून वीसच आले, ते ही आमच्या लोकांच्या काही चुका झाल्यामुळे आम्ही ८० लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत गद्दार कोण व खुद्दार कोण हे स्पष्ट केले, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here