वीज कोसळून दोन गायी ठार, सावरगावतळमध्ये ढगफुटी, उभी पीके जमीनदोस्त, फळबागा उध्वस्त, वीटभट्ट्या पाण्यात

0
120

संगमनेर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले असून विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. सावरगावतळ, निमज, धांदरफळ, नांदुरी दुमाला, पेमगिरी, कवठे धांदरफळ या गावांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. विशेषतः गहू, कांदा, हरभरा, डाळिंब आणि उन्हाळी बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विटभट्टयांमध्ये पाणी साचल्याने बीटभट्टी चालकांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले. कोठे धांदरफळ येथील शेतकरी निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गायी बीज पडून दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बुधवारी दुपारी संगमनेर शहरासह तालुक्यातील अनेक भागांत आकाश ढगांनी भरून गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस काही वेळासाठी कमी झाला असला तरी रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली, शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा आणि उन्हाळी बाजरी पाण्यात भिजली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सावरगावतळला मोठा फटका –
तालुक्यातीलसावरगावतळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला, अचानक आलेल्या पावसामुळे गावातील रस्ते आणि शेतजमीन पाण्याने तुडुंब भरून गेली. एवढेच नव्हे, तर ओढे-नाले आणि डोंगरकडे पावसाळ्यासारखे जोरात बाहू लागले. उन्हाळ्यात धबधबे वाहताना अनेक वर्षांनंतर पहायला मिळाले.

तालुक्यातील साकूर पठार, हिवरगाव पठार, निमज, नांदुरी दुमाला, सावरगावतळ, चंदनापुरी, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द आणि तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार गारपीट झाली. विजेच्या
कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. अनेकांनी कर्ज काढून शेती केली होती,मात्र पावसाने त्यांचे सर्व गणित बिघडवले आहे. शासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. प्रशासनाने या भागात तातडीने पाहणी करून मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते. दरम्यान आज गुरुवारी आ. अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकुर, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी श्री. गोसावी यांच्यासह कृषी व महसूल अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत पंचनामे सुरू करत पाहणी केली आहे. शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करावे असे आदेश तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिले.

नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा आ. अमोल खताळ

संगमनेर तालुक्यातील ज्या ज्या गावांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त भागाये तारकाळ पंचनामे करण्यात यावे. असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करा. एकही शेतकरी वंचित रहाता कामा नये. नुकसानीची सर्व माहिती घेतल्यानंतर पिडीत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेऊ आ. खताळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here