संगमनेर : संगमनेर शहरात महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली. तब्बल सात तास चाललेल्या या मिरवणुकीत सादर करण्यात आलेली अघोरी व आदिवासी नृत्याने संगमनेरकर भारावून गेले.

संगमनेर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारा पासून या मिरवणुकीला आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व महायुतीच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी ढोलीबाजा त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजयांची पालखी, बाल वारकऱ्यांचे भजन, निरगुडे जाधववाडी येथील ढोलताशा पथक, शिवकालीन मर्दानी खेळ, हरियाणावरून बोलविलेले अघोरी नृत्य, आदिवासी महिला व पुरुष आदिवासी नृत्य, कल्याण बदलापूरचे आकर्षण बँजोपथक आणि वक्रकुंड डी जे आदींचे आकर्षण या मिरवणुकीत होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तसेच बस स्थानकावर आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखे नुसार व तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे पहिले वर्ष होते. त्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. येथून पुढील काळामध्ये प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम किती आहे आणि आमचं हिंदुत्व खोटं नाही. हे संगमनेरकरांनी आज दाखवून दिले आहे. आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. छत्रपतींचा अश्वारूढ उभारण्यासाठी बस स्थानकात जागा कमी पडत आहे. त्यासाठी दोन तीन दिवसात मंत्र्यांची भेट घेणार आहेत.
-आ. अमोल खताळ,








