संगमनेर : संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार खताळ यांनी लहानपणी रामायण पाहण्याच्या आठवणींना उजाळा दिला. श्रीराम नवमी निमित्ताने विश्व
हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी- मातृशक्ती आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य दिव्य शोभायात्रा रविवार, दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५:३० वा. संगमनेर येथील अभिनव नगर येथील श्रीराम मंदिर येथे माता-भगिनींच्या हस्ते प्रभु श्रीराम यांची महाआरती होवून सुरुवात झाली.
प्रभु श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव रविवार, दि. ०६ एप्रिल रोजी दुपारी १२:०० वा. संगमनेर येथील चंद्रशेखर चौक येथील श्रीराम मंदिर, अभिनव नगर येथील श्रीराम मंदिर, पंजाबी कॉलनी, वकील कॉलनी तसेच तालुक्यातील सर्व श्रीराम मंदिरात जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शोभायात्रेत प्रभू श्रीरामचंद्र यांची सिंहासनावरील भव्य दिव्य मूर्ती, महाबली हनुमान मूर्ती, केरळ येथून आलेले कलाकार यांनी देवतांचे रूप परिधान केलेले देखावे सर्वांचे लक्ष वेधित होते. सप्तशृंगी माता मूर्ती व त्यापुढे गोंधळी, भजनी मंडळ, उज्जैन महाकाल डमरू पथक, तेजुर ढोल ताशा पथक, सनई चौघडे, आकर्षक विद्युत रोषणाई केलेले डि.जे. त्यापुढे नाचणारी तरुणाई, महिलांसाठी स्वतंत्र डि.जे. तसेच चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी अशी भव्य दिव्य शोभायात्रा नवीन नगर रोड मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, चावडी, मेनरोड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक श्रीराम मंदिर येथे रात्री १०:३० वा. महाआरती होवून शोभायात्रेची सांगता झाली. भव्य दिव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने बाल गोपाळ, महिला-पुरुष व अबाल वृद्ध अशी मोठी संख्या उपस्थित होती. बजरंग दलाच्या सर्व बजरंगीनी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.








