संगमनेर: खासदार संजय राऊत यांनी विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या मा. नीलमताई गोऱ्हे यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना महायुतीच्या वतीने आज संगमनेर शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
खा. संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे केवळ नीलमताई गोऱ्हे यांचा अवमान करणारे नाही, तर संपूर्ण महिला समाजाचा अपमान करणारे आहे. महिलांचा सन्मान राखण्याऐवजी अशा प्रकारची वक्तव्ये करून राऊत यांनी आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. यामुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली असून, त्याचा परिणाम संगमनेरमध्येही पाहायला मिळाला.
शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खा. संजय राऊत यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून, अशा वक्तव्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आ. अमोल खताळ पाटील यांचा तीव्र संताप
या आंदोलनात आमदार अमोल खताळ पाटील यांनीही सहभाग घेत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. “महिला भगिनींचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसेना महायुती आणखी तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा त्यांनी दिला.
“शिवसेना ही महिलांच्या सन्मानासाठी लढणारी पक्षसंघटना आहे. आम्ही महिलांच्या सन्मानासाठी कायमच उभे राहू. कोणत्याही परिस्थितीत महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही,” असेही अमोल खताळ पाटील यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी महायुतीच्या विविध नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत, महिलांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही वक्तव्याचा निषेध केला जाईल आणि अशा व्यक्तींना लोकशाहीमध्ये स्थान नसल्याचे ठणकावून सांगितले.








