आ. खताळ यांनी विधानसभेत वेधले सरकारचे लक्ष
मुंबई : संगमनेर शहरात सुरू असणारी गोवंश हत्या तसेच संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या तसेच तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव या देवस्थानांच्या जमिनी वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली आहे. हे कधी न गाजलेले मुद्दे आ. अमोल खताळ यांनी सर्वप्रथमच विधानसभेत मांडत राज्य सरकारचे या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगर रोड वरील सर्वे नंबर १४९ (जुना सर्वे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्वे नंबर १६२ व १७९ येथील कानिफनाथ, सुकेवाडी येथील सर्वे नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान, तसेच पारगाव येथील श्री अश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्या हक्काच्या संपूर्ण जमिनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने दावा करत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून शासनाने या जमिनींबाबत योग्य ती कार्यवाही करून त्या जमिनी परत त्या देवस्थानच्या नावावर करण्यात याव्यात, तसेच हिंदू धर्मियांच्या देवस्थानांवर होत असणारे हल्ले थांबले पाहिजेत, अशी लक्षवेधी आ. अमोल खताळ यांनी विधानसभेमध्ये मांडत या महत्वाच्या मुद्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले,
संगमनेर शहरात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्यांच्या चालक व मालकावर वारंवार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातात, मात्र प्रत्येकवेळी गोवंश कत्तल करणारा माणूस तोच असतो, मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगळा माणूस उभा केला जातो. मुख्य आरोपीवर कारवाई केली जात नाही, त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले जात आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या कत्तलखान्यांच्या विरोधात आंदोलन करूनही हे बेकायदेशीर कत्तलखाने बंद होत नाहीत. त्यामुळे शासनाने अनधिकृत कत्तलखान्यांवर योग्य ती कारवाई करून गोवंश हत्या बंदी करावी, अशी लक्षवेधी करत आ. अमोल खताळ यांनी सर्वप्रथमच संगमनेरमध्ये सुरू असणारी गोहत्या थांबविण्याची मागणी करत राज्य शासनाचे याकडे लक्ष वैधले.
पुणे जिल्ह्यात थेरगाव येथील हनुमान नगरमध्ये अनधिकृत मदरसा व मस्जिद बांधकामामुळे नागरी असुविधा आणि येथील वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, या भागात अनेक बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. त्यामुळे बळजबरी घरात घुसून स्रियांचे विनयभंग आणि अत्याचार यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे हे अनधिकृत मदरसे आणि मस्जिद जमीनदोस्त करावी, अशी लक्षवेधी आ. खताळ यांनी यावेळी केली.








