कारखान्याच्या कार्यालयाच्या खोलीतच थाटला होता दवाखाना
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथे बोगस डॉक्टरने संगमनेर सहकारी करखान्याच्या शेतकी विभाग गट ऑफिसमध्येच दवाखाना थाटून रुग्ण तपासत आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रविवार १६ मार्च रोजी ही बाब समोर आल्यानंतर प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात या बोगस डॉक्टरकडे ४ नाव नसलेल्या व्हायल, २८ सिरींज प्रत्येकी ३ एम. एल, १८ नाव नसलेल्या रिकाम्या बॉटल, डॉक्टर नाव असलेले व्हिजिटिंग कार्ड असे साहित्य आढळून आले त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तयच बाबुभाई तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादी बरून बोगस डॉक्टर इम्रान अब्दुल खान (रा. मुसेपुर, तहसील, रोसियाका, राजस्थान), भरत मधुकर बर्षे (रा. कनोली, ता. संगमनेर) यांच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकी गट कार्यालयात शेतकऱ्यांसंबधी काम करणे अपेक्षित असताना येथे बोगस डॉक्टर दवाखाना चालवत असल्याची गंभीर घटना आहे. याबाबत माहिती अशी की, वैद्यकीय अधिकारी डॉ. तयब तांबोळी यांना एका व्यक्तीने फोन केला की, आश्वी बु गावात एक इसम लोकांना आयुर्वेदिक औषधे सांगून इंजेक्शन देत आहे. तो संशयित वाटत असल्याने तरुण मुले त्याला घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात आहेत, त्यावेळी तेथे आरोग्य अधिकारी डॉ. शहनाज शेख यांनी चौकशी केली असता या बोगस डॉक्टरकडे वरील बोगस साहित्य आढळून आले. आरोपी भरत बर्षे हा कारखान्याचा गट ऑफीस सांभाळणारा कर्मचारी असून त्याच्या सहाय्याने बोगस डॉक्टर हा आश्चीमध्ये आला होता.
दरम्यान, गट ऑफिसचा कर्मचारी भरत बर्षे हा त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना आयुर्वेदीक इंजेक्शन घेण्यासाठी बोलवत होता. मी तुम्हाला पेशंट देतो, तु मला कमिशन दे असा हा व्यवहार सुरू होता, गट ऑफिसची मागची रूम देऊन या बोगस डॉक्टरचा कारभार चालू होता. काही व्यक्तींना शंका आल्यानंतर या बोगस डॉक्टरचे बिंग फुटले. वैश्चकीय अधिकारी तयब तांबोळी यांनी तु डॉक्टर आहे का?, डॉक्टराकीचे सर्टिफिकेट आहे का? त्यावर त्याने माझ्याकडे कुठल्याही प्रकारची डिग्री अथवा सर्टिफिकेट नाही असे उत्तर दिले. त्यानंतर गट ऑफिसमध्ये झडती घेतली असता तेथे काही औषधे आढळून आले. पंचनामा करून सदर बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला.








