संगमनेर : आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसिल कार्यालय तातडीने सुरू करून या भागातील ग्रामस्थ शेतकरी महीला विद्यार्थ्यांची अडचण दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरीकांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे.
पद्मश्रीं डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे प्रवरा बँकेचे व्हा चेअरमन मच्छिंद्र थेटे, निवृती सांगळे, नारायण कहार, रोहीणी निघुते, गीताराम तांबे, भगवानराव इलग, संजय गांधी, अशोकराव म्हसे, भाऊसाहेब जऱ्हाड, कारभारी म्हसे, भाऊसाहेब लोखंडे, संजय सातपुते, सुनिल डेंगळे, सुरेश भुसाळ, पंढरीनाथ अनर्थे, भिमा बुधे, अशोक जोशी, हौशीराम तांबे, भिमा शिंदे, बापुसाहेब गायकवाड आदी प्रतिनिधी आश्वी खुर्द आणि बुद्रुक, निमगावजाळी, चिंचपूर, प्रतापपूर, दाढ खुर्द, उंबरी, ओझर गावातून उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना कैलास तांबे म्हणाले की, नागरीकांची सोय व्हावी हीच भूमिका महसूल विभागाची आहे. यातून ग्रामीण भागातील लोकांना शासकीय व्यवस्थेची मदत वेळेत होवू शकेल. मच्छिंद्र थेटे यांनी निमगावजाळी येथे पुर्वी पेशवे काळात तहसिल कार्यालय होतेच. नंतरच्या काळात खरेदी विक्रीचे कार्यालय सुरू करून प्रशासनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न यापुर्वी महसूल विभागाने केला असल्याचे सांगितले.
कोणाच्याही विरोधाला न जुमानता आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसिल कार्यालय सुरू करावे, आश्वी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याच्या मागणीची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी शिष्ट मंडळाने प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.








