आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याने ग्रामविकासाला गती
संगमनेर : तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींकडे स्वतःचे कार्यालय नाही, अशा चार ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत उभारण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत प्रत्येकी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही अशा ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अनुदान द्यावे. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून मंत्री गोरे यांनी तात्काळ संगमनेर तालुक्यातील निमोण, सावरचोळ, दरेवाडी आणि झोळे या चार ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. यावेळी आमदार खताळ यांनी विशेष सहकार्यासाठी पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री मा. जयकुमारजी गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री मा. योगेशजी कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या निर्णयामुळे गावात चांगले ग्रामपंचायत भवन उभे राहून ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्रता येईल. तसेच ग्रामस्थांना सेवांचा लाभ घेण्यासाठी कायमस्वरूपी कार्यालयाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आमदार खताळ यांनी यानिमित्ताने सांगितले. तसेच महायुती सरकाराने ग्रामविकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होत असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. आता नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीत सुसज्ज सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना बसण्यासाठी कार्यालय करण्यात येईल. यासोबत ग्रामपंचायतीच्या विविध बैठकींसाठी सभागृहाची तरतूद देखील असेल. तसेच प्रसाधन गृह देखील उभारण्यात येणार आहे. परिणामी गाव कारभाऱ्यांची व ग्रामस्थांची नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे चांगलीच सोय होणार आहे.








